शिवशंभु प्रतिष्ठानने काढला गाळ
। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या मुख्य हेतूने प्रेरित झालेल्या शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने अवचित गडावरील ऐतिहासिक कुंडाचे गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे जाज्वल्य इतिहास शिव चरित्राचे प्रसार व प्रचाराचे उत्तम प्रकारे कार्य करणार्या शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे यांच्या माध्यमातून गेली आठ वर्ष शिवशंभु प्रतिष्ठान रोहा तालुक्यातील अवचितगड, घोसाळगड व भवानी या गडांवर अविरतपणे संवर्धन करत आहेत.
तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील गड किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे त्याच बरोबर गडावरील साठवण पाण्याच्या कुंडांची स्वच्छता अभियान अंतर्गत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने मावळ्यांच्या सहकार्याने श्रमदानातून स्व-कष्टाने व मेहेनतीने सामुदायिक योगदानातून येथील ऐतिहासिक अवचित गडावरील कुंडाचे गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.







