पर्यटकांकडून स्वच्छता कर वसूल करणार

नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये पर्यटनासाठी जाणारे पर्यटक आपल्या सोबत प्लास्टिकसह अन्य टाकावू साहित्य घेऊन जात असतात. मात्र, परतीच्या प्रवासात नेरळ हद्दीत आल्यानंतर टाकावू साहित्य इतरत्र फेकून देतात. तो कचरा उचलण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत स्वच्छता विभागाला अतिरिक्त कामगार लावावे लागतात. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आर्थिक भाराचा बोजा पडत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून माथेरान जाणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छता कर आकारण्यात येणार असल्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीच्या महसुलात पर्यटक स्वच्छता कराच्या माध्यमातून आणखी भर पडणार आहे.

नेरळ ग्रामपंचायत माथेरानमध्ये जाणाऱ्या पर्यटकांचे प्रवेशद्वार समजले जाते. माथेरान येथे जाण्यासाठी असलेले रस्ते आणि रेल्वे मार्ग नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधूनच जातात. त्यामुळे पर्यटक माथेरानवरून परत येत असताना सोबत नेलेला प्लास्टिक रेनकोट, खाऊचे रॅपर आणि अन्य टाकावू वस्तू नेरळ येथे आल्यानंतर जागा दिसेल तिकडे फेकून देतात. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागते. नेरळ गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या हुतात्मा चौक, नेरळ स्टेशन आणि वाहनतळ पार्किंग या ठिकाणी सर्वाधिक प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. त्यामुळे त्या प्लास्टिक कचऱ्याबाबत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी (दि.17) झालेल्या ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत माधव गायकवाड, गोरख शेप, अंकुश दाभणे, संतोष पेरणे यांनी भाग घेतला होता.

यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार माथेरान येथे जाणाऱ्या पर्यटकांकडून स्वच्छता कर संकलित करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच, प्रशासक आणि ग्रामसभा अध्यक्ष सुजित धनगर यांनी नेरळ-माथेरान प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी चालक-मालक संघटना यांच्याशी याबाबत चर्चा करून हुतात्मा चौक येथे कर संकलन केंद्र सुरू करता येईल आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसुलात वाढ होईल, असे मत मांडले. या निर्णयामुळे नेरळ ग्रामपंचायतीला वर्षाकाठी एक कोटीच्या घरात महसूली वाढ होऊ शकते.

Exit mobile version