स्वच्छतादुतांनी माथेरान पर्यटनस्थळ केले चकाचक

| माथेरान | वार्ताहर |

स्वच्छता दूत राकेश कोकळे यांनी पर्यावरण प्रेमींसोबत अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट आणि ऑलिंपिया मैदान परिसरात जवळपास नऊ हजार प्लास्टिक बाटल्या तसेच अन्य प्लास्टिकजन्य कचरा संकलन केले. यावेळी या स्तुत्य उपक्रमात वीस ते पंचवीस गोणी कचरा उचलण्यासाठी प्रकाश मोरे, किशोर कासुर्डे, गणेश बिरामने, शैलेश ढेबे, राजेश जानकर, राजू जाबरे, दीपक रांजाणे, नरेश ढेबे, अर्जून जानकर, पंकज कोकरे, अनिकेत कोकरे, सुशांत ढेबे, करण जानकर, शुभम सकपाळ, अजय खोकले आणि शबाब कुरेशी या सर्व पर्यावरण प्रेमींनी राकेश कोकळे यांना मोलाची साथ देऊन हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी घनकचरा व्यवस्थापनाची निविदा काढून ठेकेदाराला देण्यात येते. परंतु अपेक्षित कामे पूर्ण होताना दिसून येत नाहीत.त्यामुळे हा ठेका येथील भूमिपुत्र असणाऱ्या स्वच्छतादुताना देण्यात यावा जेणेकरून माथेरान हे कायमस्वरूपी स्वच्छ आणि हरित राहील अन्यथा याठिकाणी अस्वच्छतेमुळे भविष्यात पर्यटक निश्चितच पाठ फिरवून इथल्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

स्वच्छतेच्या बाबतीत माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद लाभलेला आहे. पर्यटकांची वाढती संख्या तसेच अनेक ठिकाणी कचराकुंडी नसल्याने जंगलात कचरा इतस्ततः फेकला जात आहे. यामुळ पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. या अस्वच्छता बाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे.

माथेरानचे सौंदर्य जपले पाहिजे.त्यासाठी पर्यटकांनी तसेच पॉईंट्सवरील स्टॉल्सधारकांनी सुध्दा कचरा जंगलात टाकू नये.नगरपरिषदेच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी जागोजागी कचराकुंडी लावणे आवश्यक आहे. इथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घेतली तरच इथले सौंदर्य अबाधित राहून पर्यटन बहरेल.आम्ही गोळा केलेल्या जवळपास नऊ हजार प्लास्टिक बाटल्या आणि अन्य सुका कचरा नगरपरिषदेच्या ताब्यात देणार आहोत.

राकेश कोकळे, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version