अलिबागमध्ये स्वच्छता अभियान

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सहभाग

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जागतिक समुद्र किनारा दिनानिमित्त अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने शनिवारी (दि.19) सकाळच्या सुमारास समुद्रकिनारा स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले. “स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर अलिबाग” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात समुद्रकिनाऱ्यावरील कचरा संकलित करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. हे अभियान अलिबाग शहराची ओळख आणि पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी नागरिक, स्वयंसेवी संस्था, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी अभियानात सहभागी होऊन समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली.

या अभियानात जिल्हाधिकारी किशन जावळे, राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती, उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी, समुद्रकिनाऱ्यावर वाढणारा प्लास्टिक व इतर कचरा हा पर्यावरणासाठी तसेच समुद्री जीवसृष्टीसाठी गंभीर धोका ठरत आहे. त्यामुळे केवळ एका दिवसापुरती स्वच्छता न ठेवता समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच, ‌‘स्वच्छ समुद्रकिनारा, हिरवी परंपरा, निरोगी उद्या’ या विचारातून अलिबागचा समुद्रकिनारा स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे सहकार्य करावे, असे आवाहन देखील नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले.

Exit mobile version