वेदक कॉलेजमधील एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा सहभाग
| तळा | प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षाच्या वतीने रविवारी (दि.7) ऐतिहासिक किल्ले रायगड येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. या अभियानात जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या उपक्रमामध्ये श्रावणी बारटक्के, रिया अडसुळे, उत्कर्ष चव्हाण, नम्रता चव्हाण, रितेश शिंदे, यश मोरे, वैभवी चिचघरकर, सिद्धार्थ मोरे आणि धिरज गंभीर या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. एम. शेख व डॉ. पी. बी. अभंगे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांनी आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे सर्वेसर्वा शिक्षणमहर्षी डॉ. नंदकुमार वेदक, संस्थेचे सचिव उन्मेश वेदक, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य रायगड भूषण पत्रकार पुरुषोत्तम मुळे तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व द. ग. तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांना सातत्याने यश प्राप्त होत आहे.
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी किल्ले रायगड परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
