| तळा | प्रतिनिधी |
श्री गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठान संचलित जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय, तळा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नशा मुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे ‘नशा मुक्त भारत अभियान’ अंतर्गत 17 जून ते 26 जून या कालावधीत ‘नशा मुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान’ या विषयावर ‘नशा मुक्ती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणाऱ्या लघुपटाचे प्रदर्शन गुरुवारी (दि.25) करण्यात आले. या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. अभंगे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रा. डॉ. सचिन बंगाळे यांनी अमली पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करत या दिनाच्या आयोजनाची आवश्यकता विद्यार्थ्यांना पटवून दिली. यानंतर व्यसनमुक्ती विषयक जनजागृती लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच या सप्ताहादरम्यान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पोस्टर निर्मिती स्पर्धा आणि ‘नशा मुक्त भारत अभियान’ पोर्टलद्वारे ऑनलाइन व्यसनमुक्ती प्रतिज्ञा घेण्याचे उपक्रमही राबविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नंदकुमारजी वेदक, संस्थेचे सचिव उन्मेशजी वेदक, महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य रायगड भूषण पुरुषोत्तम मुळे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा द. ग. तटकरे महाविद्यालय, तळा चे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. एम. शेख यांनी केले.







