सूरगड संवर्धन संस्थेकडून गडावर स्वच्छता मोहीम

28 वर्षांची परंपरा अविरत सुरू, पाण्याच्या टाक्या केल्या गाळमुक्त

| कोलाड | वार्ताहर |

तालुक्यातील कोलाड भागातील खांब येथील ऐतिहासिक शिवकालीन गड असलेल्या सूरगड किल्ल्यावर स्थानिक सूरगड संवर्धन संस्थेकडून मागील 28 वर्षे अखंड गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 31) सूरगडावर संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम यशस्वी राबवण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर संस्थेचे शिलेदार तसेच शिवप्रेमी, पर्यटक उपस्थित होते.

दरवर्षी स्थानिक सूरगड संवर्धन संस्थेकडून सूरगड किल्ल्यावर गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबवली जाते. यंदाही गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी सूरगडाचे शिलेदार कामाला लागले. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने येथील शिलेदार, तसेच गड संवर्धन शिवप्रेमी यांनी मोहिमेस प्रारंभ केला. या मोहिमेतून शिलेदारांनी गडाच्या उत्तर बुरूजाकडील पाण्याच्या टाकीतील चिखल, माती, दगडगोटे, गाळ साफ करत पाण्याच्या टाकीला गाळमुक्त केले.

गडावर पावसाळ्यादरम्यान रस्त्यावर आलेले दगडगोटे, काटेरी झुडपे, पायवाटा मोकळ्या करणे तर काही ठिकाणी ढासळलेले चिरे बसवण्याचे काम येथील स्थानिक सूरगड संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. नव्याने उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे दर्शन घेत छत्रपती शिवरायांना मानवंदना देत स्थानिक सूरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी गडाकडे प्रस्थान करून 28वी मोहीम यशस्वी पार केली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक सूरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version