जिल्ह्यात मलेरियाचे 249, डेंग्युचे 190 रुग्ण झाले बरे
| रायगड | खास प्रतिनिधी |
राज्याच्या काही भागामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसने डोके वर काढले आहे. रायगड जिल्ह्यात अद्यापही झिका व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नसला, तरी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्युचे 190, तर मलेरियाचे 249 रुग्ण आढळले होते. सर्व रुग्ण बरे झाले असून, पैकी डेंग्युसदृश्य सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झिका व्हायरसचा प्रसार एडीस डास चावल्याने होतो. त्यामुळे नागरिकांनी डासापासून आपले संरक्षण करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
जानेवारी ते जून 2024 या कालावाधीत डेंग्युचे 190 रुग्ण आढले आहेत. त्यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामासंबंधित विकासकामे सुरु आहेत. आतापर्यंत सहा डेंग्युसदृश्य रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अन्य रुग्ण बरे झाले आहेत. उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. डेंग्युसदृश्य रुग्णांच्या मृत्यूचे ऑडिट केले जाते. त्यानंतरच संबंधित रुग्णाचा डेंग्युने मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. जानेवारी ते जून 2024 या कालावधीत 249 मलेरियाचे रुग्ण आढळले असून, सर्व रुग्ण योग्य औषधोपचाराने बरे झाले आहेत.
कशामुळे होतो?
एडीस डास चावल्यामुळे झिका व्हायरसचा प्रसार होतो. एडीस डास हा सकाळी आणि सायंकाळी चावल्याने प्रसारास मदत होते. याच डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार पसरतात. त्याचप्रमाणे लैंगिक संबंधातूनही झिका व्हायरसचा प्रसार होतो.
झिका व्हायरसची लक्षणे?
झिकाची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी असते. दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणे आढळतात. हलकासा ताप, डोळे लाल होणे आणि सुजणे, डोकेदुखी, गुडघेदुखी, शरीरावर लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसून येतात.
परिसर स्वच्छ ठेवणे, पाणीसाठा होऊ देऊ नये, डासांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे, डास चावू नये म्हणून जास्तीत जास्त अंग झाकले जातील असे कपडे घालणे. झोपण्यासाठी मच्छरदानीचा वापर करणे, डासांचा प्रसार रोखणाऱ्या औषधांचा वापर करणे. झिका व्हायरस हा एडीस डास चावल्यामुळे होतो. जिल्ह्यात याचा अद्यापही रुग्ण आढळलेला नाही. मृत्यू ओढवण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड