जिल्ह्यात 56 ठिकाणी मटक्यांच्या टपर्या; काशिनाथ ठाकूरांचा आरोप
। अलिबाग । कृषीवल टीम ।
रायगड जिल्ह्यात काही कालावधीसाठी बंद झालेला मटका पुन्हा डोके वर काढत आहे. कारवाईचा धाक कमी झाल्याने चोरी-छुपे ओपन-क्लोजचा खेळ पुन्हा तेजीत येत आहे. तरुण पिढी मटक्याच्या नादी लागून बरबाद होत असतानाही लोकप्रतिनिधी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. आकडेमोड करणार्या पाट्या खुलेआम झळकू लागल्या आहेत. अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. यासाठी पोलीस विभाग जबाबदार असल्याचा आरोप अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे. अनेकदा तक्रारी तसेच पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच त्यांनी आझाद मैदान येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
याबाबतचे निवेदन ठाकूर यांनी मुंख्यमंत्री, पोलीस महासंचालक, कोकण आयुक्त, रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना दिले आहे. ठाकूर यांच्या सांगण्यानूसार रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. यामध्ये मटका, जुगार, ऑनलाईन चक्री, चिमणी-पाखरं, पताडा, अंदर-बाहर, तीन पत्ती जुगार आदींंचा समावेश आहे.
यामुळे सर्वसामान्य, कामगारांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनच्या वसुलदारांकडून हप्ते घेऊन हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे सर्व सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे. त्यांच्या मदतीशिवाय हे अवैध व्यवसाय चालणे शक्यच नसते. हिंमत द्यायची, मटका सुरू करायला लावायचा आणि नंतर हप्ते वसूल करायचे अशा प्रकारातून ‘तेरी बी चूप, और मेरी बी चूप’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खाकी वर्दीकडून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे.
या ठिकाणी धंदे सुरु
नेरळ : 3, खोपोली : 2, रसायनी : 1, पोयनाड : 2, मांडवा : 3, मुरुड : 3, श्रीवर्धन : 2, रोहा : 2, नागोठणे : 2, माणगाव : 3, महाड : 2, पोलादपूर : 2, कर्जत : 2, माथेरान : 2, खालापूर : 1, पेण : 2, अलिबाग : 5, , रेवदंडा : 3, दिघी : 2, म्हसळा : 2, कोलाड : 2, पाली : 3, महाड शहर : 3, गोरेगाव : 2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक लक्ष देत तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई करुन ते बंद करावेत. अन्यथा 26 जानेवारी रोजी न्याय मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार आहे. त्यानंतर होणार्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी मुंख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांची राहील.
अॅड. काशिनाथ ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते