जमीन आणि भवितव्याच्या लढ्यात शेतकरी रस्त्यावर
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील तब्बल 88 गावांवर एमएमआरडीएचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असताना आता शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर 88 गाव एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने मंगळवार, दि. 19 मे रोजी प्रांत कार्यालयावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनात संघर्ष समितीचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ आणि भूमीपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
उपोषणस्थळी शेतकऱ्यांच्या घोषणा, सरकारविरोधातील रोष आणि भविष्यातील भीती स्पष्टपणे जाणवत होती. ‘आज जमिनी गेल्या तर उद्या आमचं अस्तित्वच संपेल,’ अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एमएमआरडीएच्या विस्ताराच्या नावाखाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि स्थानिक भूमीपुत्रांना हळूहळू देशोधडीला लावण्याचा डाव सुरू असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना अतुल म्हात्रे यांनी एमएमआरडीएच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. आजचा लढा हा केवळ जमिनीचा नाही, तर अस्तित्वाचा आहे. जर शेतकरी आज संघटित झाला नाही, तर उद्या आपली जमीन, आपली ओळख आणि पुढच्या पिढ्यांचे भविष्य कायमचे हिरावले जाईल. एमएमआरडीएच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला. भविष्यात या प्रश्नाची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या भाषणानंतर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये अधिक संताप आणि लढ्याची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले.
निवडणुकीच्या वेळी मतांसाठी घराघरात फिरणारे नेते आज शेतकऱ्यांच्या लढ्यात कुठे लपले आहेत? असा संतप्त सवाल उपोषणस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. काही पदाधिकाऱ्यांनी तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त राजकारण करणारे लोकप्रतिनिधी आता पूर्णपणे उघडे पडले आहेत, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
पेण तालुक्यातील 88 गावांचा हा एल्गार भविष्यात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, सरकार आणि प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर हा संघर्ष अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधींची भूमिका संशयास्पद
एमएमआरडीएच्या मुद्द्यावर शेतकरी उन्हात बसून आपल्या हक्कासाठी लढा देत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेली संशयास्पद शांतता आता अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. एकीकडे शेतकरी आपल्या जमिनी आणि भवितव्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती हा जनतेच्या विश्वासाला तडा देणारा प्रकार असल्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात रंगू लागली आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
उपोषणस्थळी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ एकजुटीने उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, ज्या स्थानिक लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी शेतकऱ्यांनी गावोगाव फिरून मेहनत घेतली, तेच लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर पूर्णपणे गायब असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.







