सकाळी साडेदहाला कार्यालयात शुकशुकाट
| पेण | प्रतिनिधी |
शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.45 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना, पेण येथील उपप्रादेशिक कार्यालयात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतही शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्हास्तरीय महत्त्वाचे कार्यालय म्हणून ओळख असलेल्या या कार्यालयात केवळ विजय चौधरी हे एकमेव अधिकारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.
विशेष बाब म्हणजे, कार्यालयात अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असतानाही अनेक विभागांमध्ये फॅन आणि लाईट सुरूच असल्याने विजेची उघडपणे उधळण होत असल्याचे वास्तव समोर आले. एकीकडे शासनाकडून वीज बचत, ऊर्जा संवर्धन आणि काटकसरीचे धडे दिले जात असताना, दुसरीकडे शासकीय कार्यालयातच नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कार्यालयातील ढिसाळ शिस्त, वेळेचे पालन नसणे आणि जबाबदारीचा अभाव यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या महत्त्वाच्या कार्यालयातच अशी अनागोंदी असेल, तर सामान्य जनतेने न्याय आणि सेवा नेमकी कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
या प्रकाराबाबत उपप्रादेशिक अधिकारी माधव सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपण कामानिमित्त पनवेल येथे असल्याचे सांगितले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.45 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. जे कर्मचारी व अधिकारी अनुपस्थित आढळले आहेत, त्यांच्याविरोधात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
यावेळी मंगेश नाईक यांना बाहेर शासकीय कामानिमित्त पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, कार्यालयातील बेशिस्त कारभार आणि विजेची उघड उधळण यामुळे पेण उपप्रादेशिक कार्यालयाचा ढिसाळ आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.






