दररोज 180 मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन
| मुंबई | प्रतिनिधी |
मुसळधार पाऊस आणि त्यामुळे समुद्रात वाहून गेलेला तसेच भरतीच्या लाटांमुळे पुन्हा किनाऱ्यावर येणाऱ्या कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरून दररोज सुमारे 180 मेट्रिक टन कचरा हटविण्यात येत आहे.
मागील दहा दिवसात सुमारे 1 हजार 800 मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. ही स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करून जुहू समुद्र किनारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त किरण दिघावकर यांनी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री तैनात केली आहे.
यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात 1 हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने लहान नाले आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून गेला होता. भरतीच्या लाटांमुळे हाच कचरा आता पुन्हा किनाऱ्यावर येत आहे. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे अतिरिक्त यंत्रणा उभी करून किनारा स्वच्छतेवर भर दिला जात आहे.
सुमारे 7 किलोमीटर लांबीच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर सध्या दररोज जवळपास 350 मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर वाहून येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम राबवत आहे. दररोज सुमारे 180 मेट्रिक टन कचरा हटविण्यात येत आहे. मागील दहा दिवसांतच समुद्र किनाऱ्यावरून सुमारे 1 हजार 800 मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.
आव्हानात्मक हवामानातही समुद्र किनारा स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी खुला ठेवण्यासाठी महानगरपालिकेने मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर तैनात केली आहे. त्यामुळे समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळाली आहे.
कचरा हटविण्याच्या कामाला वेग
यंदाच्या पावसाळ्यात कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने महानगरपालिकेने नेहमीच्या यंत्रणेसोबत अतिरिक्त स्वरुपात 1 बीच क्लिनिंग मशिन, 2 बॉबकॅट्स, 5 डंपर्स, 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 पोकलेन मशिन्स तसेच दोन सत्रांमध्ये कार्यरत 90 अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे कचरा हटविण्याच्या कामाला अधिक वेग मिळाला आहे.
नागरिकांना आवाहन
समुद्र किनारा किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे विशेषतः पावसाळ्यात नाले आणि जलवाहिन्यांमध्ये कचरा जाणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी आणि मुंबईच्या सागरी पर्यावरणाचे तसेच भावी पिढ्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आवाहन उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केले आहे.







