। पनवेल । प्रतिनिधी ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
पनवेलमधील उन्नती मार्ग ब्रिज परिसरातही या मोहिमेअंतर्गत साफसफाई करण्यात आली. ब्रिजवर काढण्यात आलेल्या चित्रांवर पाण्याचे फवारे मारून स्वच्छता करण्यात आली. तसेच पानांच्या थुंकीचे डाग, तंबाखूचे डाग आणि इतर घाण सर्फच्या सहाय्याने धुऊन काढण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत आरोग्य निरीक्षक स्वतः उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करण्याचे काम मनोभावे केले.
आगामी आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत असून नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.







