| नेरळ | वार्ताहर |
कर्जत आणि दहीवली गावांना जोडणार्या उल्हास नदीवरील श्रीराम पुलाचे खांब हे झाडे झुडपे यांनी व्यापले होते. त्याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते यांनी शासनाच्या सर्व यंत्रणा यांना त्याबाबत निवेदने देऊन सूचित केले होते. दरम्यान, रविवारी सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीराम पुलाच्या खांबावर जगलेली झाडे झुडपे छाटून टाकली आहेत.
मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर पूल आहे. किमान 40 वर्षे जुन्या असलेल्या या पुलाच्या खांबांवर जंगली झाडे जगली होती. पक्षांनी आपल्या विष्ठेतून टाकलेल्या बिया यातून या झाडांची निर्मिती झाली होती. गेली अनेक वर्षे लहानाची मोठी होत चाललेली झाडे पुलाच्या पिलर वर उभी राहिली आहेत. लहानाची मोठी झालेली ही झाडे पूलाच्या मजबुतीकरणमध्ये अडथळा निर्माण करत होती. या झाडांची मुळे ही पूलाच्या खांबांमध्ये घुसून पूलाचे खांब निकामी करण्याची भीती होती. हे लक्षात घेऊन स्थानिक गिर्यारोहक आणि सामाजिक कार्यकर्ते विकास चित्ते यांनी उल्हास नदीवरील श्रीराम पूलाच्या धोका ओळखला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत नगरपरिषद, पाटबंधारे विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांना लेखी निवेदने देवून उल्हास नदीवरील पुलावर उगवलेली आणि आता किमान दहा फूट जून अधिक उंचीची झालेली झाडे यांची छाटणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर संबंधित पुलावरील प्रत्येक खांबांवर उभी राहिलेली झाडे झुडपे यांची छाटणी करण्यात आली.






