उद्या येणार बाहेर
| मुंबई | प्रतिनिधी |
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनिल देशमुखांच्या जामिनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची बुधवारी (दि.28) कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाची दहा दिवस अंमलबजावणी न करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, देशमुखांच्या सुटकेच्या आदेशाला देण्यात आलेल्या स्थगितीची मुदत आज (दि.27) संपणार होती. याप्रकरणी आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवण्यात यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. मात्र, सीबीआयची ही मागणी उच्च न्यायालायने फेटाळून लावली. त्यामुळे उद्याच अनिल देशमुखांची सुटका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.