| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
सुकापुर येथे नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती आणि सुकापुर सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. या नैनाविरोधी बैठकीला सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आम्हाला एफ.एस.आय वाढवून द्या जेणेकरून आमचा पुनर्विकासाचा प्रश्न सुटेल. आम्ही 60 टक्के जागा देणार नाही ही भूमिका घेऊन येथे सर्व उतरलेले होते. या बैठकीसाठी मोठ्या संख्येने सोसायटी सदस्य ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रोजेक्टरद्वारे आर्किटेकट अतुल म्हात्रे यांनी नैना प्राधिकरण महानगरपालिका एम.एम.आर.डीए, एम.एस.आर.डीसी ,जुनं सिडको क्षेत्र यामधील तुलनात्मक गोष्टी लोकांसमोर ठेवल्या. आणि नैना किती घातक आहे हे सर्व नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मुळात आमची जागा मोफत 60 टक्के आम्ही द्यायचीच का? याच प्रश्नावरती ग्रामस्थांनी आणि सोसायटीचे सदस्य यांच्यामध्ये चर्चा रंगली, नैना शेतकर्यांसाठी घातक असल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. या ठिकाणी नैनाने कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता हे प्राधिकरण आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केलेला आहे असं स्पष्ट मत राजेश केणी यांनी व्यक्त केलं.
आम्हाला आमच्या सोसायट्यांचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने 2 चा एफ एस आय मिळावा आणि आमच्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंग पुनर्विकासासाठी जाव्यात अशा पद्धतीची इच्छा सर्व नागरिकांनी बोलून दाखवली. बिल्डिंगला साधारणता 30- 32 वर्षे झाली आहेत. आम्ही स्वतःची कष्टाची मेहनतीची कमाई लावून या ठिकाणी घरे घेतली, लोनचे हप्ते फेडता फेडता आमचा जीव मेटाकुटीला येत होता. आज लोनचा कालावधी संपायची वेळ आणि बिल्डिंग तुटायची वेळ ही एकच झालेली आहे. त्यामुळे शासनाने आमची खरी परिस्थिती जाणून यावरती न्याय द्यावा अशा पद्धतीची भूमिका राजेश केणी यांनी मांडली. शेखर शेळके यांनी हा लढा 2013 पासून सुरू असल्याचे सांगताना समाजातील कोणत्याच घटकाचा यामध्ये फायदा होत नसल्याचे सांगून फायदा जो होतो तो फक्त नैना प्रशासनाचा होतो. या बैठकीमध्ये सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं.
सुरेश ठाकूर यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना आंदोलनासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. दत्ता भगत,राजेश केणी, नामदेव फडके, शेखर शेळके ,सुभाष भोपी, बाळाराम फडके, गजानन पाटील, बबन फडके, जगदीश वाघमारे, एड रामचंद्र वाघमारे, किसन भुजंग, किशोर पाटील, अनिल उलवेकर ,प्रभाकर केणी, संदीप म्हसकर, संजय फडके, सुदाम वाघमारे, अरुण रोकडे, प्रदीप ठाकरे, शशिकांत पवार, सचिन सर्जे, अमृत गांगुर्डे आदी मंडळी उपस्थित होते.