। खोपोली । प्रतिनिधी ।
मुख्य बाजारपेठेचे प्रवेशद्वार असलेल्या समाजमंदिर रोडवर सागर प्लाझा हॉटेलसमोर सांडपाण्याचा निसरा व्यवस्थितरित्या होत नसल्यामुळे तुंबलेले सांडपाणी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि रस्त्यावर साठत असल्यामुळे दवाखान्यातील कर्मचार्यांना तसेच रहदारी करताना शाळकरी विद्यार्थी, महिला, आबालवृद्धांना नाहक त्रास होत असल्याने काँग्रेसच्या शहर पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेत सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
समाजमंदिर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील पावसाचे पाणी वाहून येत मुख्य गटात न जाता रस्त्यावरच साठत असल्यामुळे ते पशुवैद्यकीय दवाखान्यात तुंबते. त्यामुळे येथील कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
मागील आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे पावासाचे पाणी रस्त्यावरच साठत असल्याने त्याचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, युवक शहर अध्यक्ष संदेश धावारे, इंटक शहर अध्यक्ष अरूण गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेत सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता लगाटे यांना घटनास्थळी बोलवून सविस्तर समस्या दाखवली. दरम्यान, यावर तातडीने उपाययोजना करणार असल्याचे लगाटे यांनी सांगितले आहे.