। खोपोली । प्रतिनिधी ।
नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ येथील डी.पी. रोड सेव्हन वेळास या हॉटेलसमोर कचरा संकलन करणार्या खासगी ठेकादाराची आठ ते दहा छोटी-मोठी वाहने या परिसरातील रस्त्यावर उभी करीत असल्याने, या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा संकलन करणारी वाहने अन्य जागेत हलवावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

खोपोली शहरातील सर्वच नगरपालिका हद्दीतील एकूण प्रभागातील घंटागाड्या आपापल्या प्रभागातून कचरा घेऊन त्या चिंचवली शेकिंग येथील डी.पी. रोड परिसरात अनलोडिंग करतात. त्यामुळे कचरा तेथे कायम पडत असतो. मात्र, तो कचरा उचलला जात नाही, असे सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच सदरची वाहने अनेक वर्षे स्वच्छ करीत नसल्याने त्याची पसरणारी दुर्गंधी यामुळे येथील विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना त्रास होत असल्याने येथील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांच्याकडे या गाड्या अन्य ठिकाणी हलवाव्या, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे डी.पी रोड रस्त्यावर विजेचे खांब नसल्याने, येथे चोरीच्या अनेक घटना घडल्याचे येथील रहिवाशांनी मुख्याधिकारी यांच्याशी बोलताना सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव, आरुण पाटकर, सागर बिरवाडकर, निवृत्ती आंधळे, नबिन शेख, माधु शिंदे उपस्थित होते. दरम्यान, डीपी रोडवरील उभ्या करण्यात येणार्या कचरा संकलन करणार्या गाड्या आम्ही चार ते पाच दिवसांत अन्य ठिकाणी ठेवण्याची सोय करू, असे आश्वासन मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांनी दिले आहे.