खुले परवाने त्वरीत बंद करा

रिक्षा संघटनेचा आरटीओवर धडक मोर्चा

| पनवेल । प्रतिनिधी ।

रिक्षा चालक-मालक यांची सद्दस्थितीत व्यवसायाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. जीवन जगणे मुश्कील झाले असून कुंटुबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण झाले आहे. रिक्षाचा व्यवसायामध्ये जीवघेणी स्पर्धा वाढल्यामुळे जीवन जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खुले परवाने त्वरीत बंद करावे, कल्याणकारी महामंडळाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. ई चलनातून रिक्षा मालक-चालक यांना वगळण्यात यावे असे अनेक मागण्या घेवून आज (दि.6) पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर रायगड जिल्हा रिक्षा संघटना संयुक्त महासंघाने धडक दिली.

रिक्षाच्या वाढत्या संख्येमुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाह प्रश्‍न निर्माण झाला असून रिक्षा व्यवसाय होत नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. मुलांचा शिक्षणाचा खर्च, म्हातार्‍या आईवडीलांचे औषध उपचाराचा खर्च, रिक्षाच्या कर्जाचे हप्ते, घरभाडे खर्च, रिक्षाचा देखभाली खर्च, रिक्षा इंशुरन्स पासिंग आणि त्यात वाढती महागाई यामुळे रिक्षाचालक मालक यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. सरकारकडून होणारा दंड या सर्व चक्रव्युहामध्ये रिक्षा चालक-मालक पुरता होरपळून गेला आहे. सरकारने मायबाप या नात्याने आमच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अशी विनंती रिक्षा संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावेळी पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, गजानन घाडगे यांची रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. त्यात मिटर आणि सिलिंडर पासिंगचे पैसे आकारले जाणार नाहीत. गृह सोसायट्यांनी सुरू केलेली खाजगी बस सेवा त्वरीत बंद करण्यात येईल. वाहन पेंसिग ट्रॅकवर बसण्यासाठी शेड, कॅन्टीन, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि खुले परवाने बंद करण्याचा विषय केंद्राचा असल्याने त्यासाठी पत्रव्यवहार केला आहे असे परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी सांगितले.


Exit mobile version