जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळांची होणार दुरुस्ती
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
पटसंख्येअभावी बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा उघडल्या जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील 300 हून अधिक शाळा मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबरला पुन्हा सुरु होणार आहेत. या शाळांची डागडूजी, रंगरंगोटी व अन्य सुविधा उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत दुरुस्तीची कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांना पुन्हा एकदा बहर येणार आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजारहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 95 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील काही वर्षापुर्वी पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याआला होता. पटसंख्ये अभावी जिल्ह्यातील 300 हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्यात आल्या. गेल्या पाच वर्षात बंद पडलेल्या शाळांकडे कोणीही फिरकला देखील नाही. त्यामुळे शाळाचा परिसरात गवत वाढणे, दारे, खिडक्या खराब होणे, भिंतीना तडे पडणे, भिंतीवरील रंग उडणे अशी बिकट अवस्था झाली आहे.
यंदा रायगड जिल्हयातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, महाड, श्रीवर्धन, कर्जत सात विधानसभा मतदारसंघाचे मतदान 20 नोव्हेंबरला आहे. मतदान केंद्र सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. शाळांमधील परिसर स्वच्छ करण्याबरोबरच उभारण्यात येणार्या मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचार्यांची गैरसोय होऊ नये यासाठी तयारी सुरू केली आहे. शाळांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कामाला लागला आहे. मतदानामुळे जिल्ह्यातील तीनशेहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आता पुन्हा बोलक्या होणार आहेत.