17 जणांचा मृत्यू; 32 भाविक बेपत्ता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरच्या रियासी आणि रामबन येथे ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अक्षरशः हाहाकार उडाला आहे. दगड, माती आणि चिखलाच्या लोंढ्याखाली अनेकजण दबले असण्याची शक्यता असून, अनेक घरे, दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण बेपत्ता झाले आहेत.
14 ऑगस्टपासून या भागात सातत्याने ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यात रियासीमध्ये 12 जणांचा, तर रामबन येथे 5 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वैष्णोदेवी यात्रा मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे रविवारी पाचव्या दिवशीही स्थगित करण्यात आली. आतापर्यंत 34 भाविकांचा मृत्यू झाला असून, कटरा ते वैष्णोदेवीपर्यंतच्या 12 किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे उखडला गेला आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. परिणामी, तब्बल 557 रस्ते बंद करण्यात आले आहेत. यात तीन राष्ट्रीय महामार्ग आणि मंडीतील सर्वाधिक 213 रस्त्यांचा समावेश आहे, तर उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
