| नैनिताल | वृत्तसंस्था |
उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये 4 स्थानिक लोक आणि 16 नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफकडून शोध मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी गौरीकुंड धरण पुलियाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली 20 जण दबले गेले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 17 जणांना शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळपासून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.