। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोर्लईतील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा वाद चांगलाच पेटला आहे. कोर्लईच्या सरपंचांनी बंगले नसल्याचा खुलासा केल्यानंतर हरवलेले बंगले शोधण्यासाठी किरीट सोमय्या शुक्रवारी (दि. 18) कोर्लईत आले.
या दौर्यात प्रशासनाने अडवले तर माघारी फिरण्याची तयारी आहे. पण राजकीय विरोध झाला तर तो मान्य नसेल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या बंगल्यांचे नेमके काय झाले याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. दरम्यान शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असाल तर उत्तर देऊ अशा शब्दात इशारा दिला आहे. याठिकाणी शिवसेना विरूद्ध भाजप असा वाद पेटण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीकडे 2009 पासून अन्वय नाईक आणि त्यांच्यानंतर रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा वायकर मालमत्ता कर भरत आहेत. त्यामुळे या बंगल्यांचे नेमके काय झाले हे समजून घ्यायचे आहे. तसेच हे बंगले अचानक कसे गायब झाले हेदेखील समजून घ्यायचे असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.