| मुंबई | प्रतिनिधी |
इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांचे आर्थिक गणित बिघडले असतानाच आता सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 50 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीचा दर प्रतिकिलो 91 रुपये 50 पैसे झाला आहे. ही दरवाढ दि.14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या किमतींमुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. सीएनजीच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांना बसण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या चालकांना आता सीएनजीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे वाहन चालवण्याचा खर्च वाढणार असून, व्यवसायातील नफ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
सीएनजीचे दर वाढले
