| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला टी-20 विश्वकरंडकातील साखळी फेरीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. त्याच्या फलंदाजी फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे; मात्र भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी विराट कोहली पुढल्या फेरीत चांगली फलंदाजी करील, अशी आशा व्यक्त करतानाच तो अपयशाने आणखी एकाग्र झाला आहे, असे म्हटले आहे.
यावेळी विक्रम राठोड म्हणाले, मला कल्पना आहे की लोक आत्ता का प्रश्न विचारत आहेत. विराटला तीन सामन्यात धावा करता आल्या नाहीत. एक सांगतो म्हणून आम्हाला एक कण दडपण आलेले नाही किंवा मनात शंका निर्माण झाल्या नाहीत. विराटच्या बाबतीत मी इतकेच सांगेन की नेहमीच तो संघासाठी चमकदार कामगिरी करायला उत्सुक असतो. मला उलट एक चांगली गोष्ट दिसते आहे. विराटला थोडे अपयश आल्याने तो चांगली कामगिरी करायला अजून भुकेला झाला आहे. मला वाटते आहे की तो ‘सुपर आठ’ फेरीत धमाल कामगिरी करून दाखवेल. कारण तो कमाल मेहनत करत आहे. सरावादरम्यान खूप सुंदर फलंदाजी करत आहे आणि अर्थातच विराट जिद्दी आहे, असे विक्रम राठोड विश्वासाने म्हणाले.