कोळसा ट्रान्सपोर्टचे काम प्रकल्पग्रस्तांना मिळावे; अन्यथा धरणे आंदोलन

। उरण । वार्ताहर ।

करंजा बंदरातून कोळशाची वाहतूक होत आहे. तरी या वाहतुकीचे काम येथील स्थानिक भूमिपुत्रांना मिळावेत अशी मागणी उरण पनवेल विभाग लॉरी मालक सेवा संघाने लावून धरली होती. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देऊनही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने धरणे आंदोलन करण्याचा इशारा सेवा सघांकडून देण्यात आला आहे.

उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल भावाने सिडकोने खरेदी केली आहे. त्यामुळे येथील शेतकरी भूमिहीन झाला असल्याने त्यांनी उपजीविकेसाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरण-पनवेल विभाग लॉरी मालक सेवा संघ या संस्थेची स्थापना केली होती. मात्र, येथील करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिकमधून कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी या ट्रान्सपोर्टचे काम हे येथील प्रकल्पग्रतांना मिळण्यासाठी संघाने सातत्याने पाठपुरावा करूनही याकडे प्रशासन जाणुनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या संघ संस्थेकडून होत आहे. याबाबत तहसीलदारांना दि.7 जुन रोजी पत्र देण्यात आले होते. यानंतर 28 जुन रोजी पुन्हा पत्र देऊन या विषयांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी संघाने केली होती. तरीही याबाबत कोणताच तोडगा अथवा चर्चा झाली नाही. त्याचा निषेध म्हणून करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिकच्या मुख्य प्रवेशद्वार येथे धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version