एलईडी व पर्ससीन मासेमारी करणार्या 4 बोटी समुद्रात पकडल्या
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
शासनाने एलईडी व पर्सनेट मासेमारी करण्यावर बंदी असतानासुद्धा अलिबाग कोळीवाड्यातील काही मच्छीमार बांधव कोणालाही न जुमानता कायदा धाब्यावर बसून खोल समुद्रात मासेमारी करत असताना मुरुड येथील भारतीय तटरक्षक दलाने 2 एलईडी व 2 पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करणार्या समुद्रात बोटी पकडल्या. ही या आठवड्यातील भारतीय तटरक्षक दलाची ही दुसरी कारवाई आहे.
भारतीय तटरक्षक जवान रोजच्याप्रमाणे समुद्रात ‘सुजीत अग्रीम’ जहाजावरुन टेहळणी करत असताना पहाटे 4 बोटी वेगवेगळ्या अंतरावर एलईडीद्वारे मासळी पकडत असताना निर्दशनास आल्या. तटरक्षक दलाच्या जवानाने बोटींना घेराव घालून अलिबाग कोळीवाड्यातील बल्लाळेश्वर, सिध्दीविनायक, कुलस्वामिनी व बल्लाळेश्वर या 6 सिलेंडरच्या 4 बोटी खोल समुद्रात एलईडी व पर्ससीन जाळ्याद्वारे मच्छी पकडणा-या 2 पर्ससीन नेट व 2 एलईडी बोटीवर असणार्या खलाशांना पकडून मत्स्यविकास व परवाना अधिकारी याना कळविण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी 20 मार्चला आक्षी साखर, अलिबाग येथील 4 एलईडी व 6 पर्ससीन नेट बोटी पकडल्या होत्या. या बोटीतून लाखो रुपयांची मच्छी हस्तगत केली होती.
याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्याचे मत्स्यविकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी सांगितले की, भारतीय तटरक्षक जवानांनी पहाटेच्या दरम्यान एलईडी व पर्सनेट मासेमारी करणार्या 4 बोटीवरील 37 खलाशांना पकडले असून त्यांची चौकशी करुन महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारित अध्यादेश 2021 या अंतर्गत करण्यात येणार आहे. अशी माहिती मत्स्यविकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी दिली.
भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी यांनी माहिती देताना म्हणाले की, आमचे जवान गस्त घालताना पहाटेच्या दरम्यान खोल समुद्रात बोटी संशयीत दिसून आल्यावर जवानांनी एका बोटीला घेराव घातला. त्या बोटीतून एलईडी समुद्राच्या पाण्यात टाकलेली दिसून आल्यावर त्यांना ताब्यात घेतल्यावर बाकीच्या बोटी पळू लागल्या पळत असताना आमच्या जवानांनी त्या सर्व बोटींना ताब्यात घेतल्यावर चौकशी दरम्यान या 4 ही बोटी बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आले. या चार बोटीत 37 खलाशी आढळून आले. त्यापैकी एक 12 वर्षाचा मुलगा आहे. हे सर्व सुलतान पुरी उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत. पकडलेल्या 2 बोटीतून 1 टनपेक्षा जास्त मच्छी, 22 एलईडी अंदाजे 18 लाख रुपयांचा, 3 जनरेटर, पर्सनिलनेट असे अंदाज 30 लाख रुपयांचा माल हस्तगत करुन मत्स्य विकास व परवाना अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी यांनी दिली.