| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सर्पसंवर्धनाचा संदेश देणारी घटना घडली. कुंडेगाव येथील लक्ष्मण पाटील यांच्या बागेतील जाळ्यात अडकलेल्या नागाची सर्पमित्र राहुल पाटील यांनी सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले.
दि.15 ऑगस्ट रोजी लक्ष्मण पाटील यांच्या बागेत नाग जाळ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. हा नाग आदल्या दिवसापासून जाळ्यात अडकलेला असूनही जिवंत असल्याची माहिती मिळताच दादरपाडा येथील सर्पमित्र राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. बागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने त्यांनी पाण्यात उतरून जाळ्यासह नागाला रस्त्यावर आणले.त्यानंतर कात्रीच्या सहाय्याने जाळे काळजीपूर्वक कापून नागाची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला चिरनेर येथील जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आले. नागपंचमीला नागपूजा करण्यापेक्षा सापांचे संरक्षण आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडणे, हाच खरा सर्पसंवर्धनाचा संदेश असल्याचे राहुल पाटील यांच्या या कृतीतून दिसून आले.
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
