सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील सर्पमित्रांनी अवघ्या आठ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी अजगर, नाग आणि घोणस जातीच्या सापांना पकडून जीवदान दिले आहे. या कामगिरीबद्दल वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तालुक्यातील सर्पमित्रांचे कौतुक केले आहे.
शुक्रवारी पहाटे अडीच्या सुमारास पालीतील उंबरवाडी येथील ऋषभ खंडागळे यांच्या घराच्या माळ्यावर नाग आला होता. या नागाला पालीतील सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी शिताफीने पकडले. तर उद्धर येथील एका फार्म हाऊसच्या स्विमिंग पुलमध्ये घोणस जातीचा विषारी साप पडला होता. या सापाला येथील सर्पमित्र तुषार केळकर यांनी पकडून बाहेर काढले. तसेच जाधववाडी येथील दिनेश जाधव यांच्या गुरांच्या वाड्यात भला मोठा अजगर शिरला होता. या अजगराला परळीतील सर्पमित्र अमर पाल व शहनवाज शेख यांनी सुखरूप पकडले. हा अजगर सुमारे 7 ते 8 फुट लांब आणि 12 ते 15 किलो वजनाचा होता. त्याला पाहून येथील सर्वांची भंबेरी उडाली होती. या सर्व सापांना तालुका वनविभागाच्या मदतीने सुखरूप जंगलात नेऊन सोडण्यात आले आहे.