नायजेरियन नागरिक गजाआड
। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर परिसरात अंमली पदार्थ्याची अवैध विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 8 लाख 19 हजार रुपये किंमतीचे उच्च दर्जाचे कोकेन आणि मेफेड्रॉन (एमडी पावडर) जप्त केले आहे. या नायजेरियन नागरिकाला अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या नायजेरियन नागरिकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
खारघर, सेक्टर-36 मधील अमनदुत मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडवर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमनदुत मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ सापळा रचला होता. यावेळी या ठिकाणी उमुन्ना अँडयुब्युसी विल्याम्स (46) अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी असताना, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 3.99 लाख रुपये किमतीचे एकूण 13.3 ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन (एम.डी. पावडर), तसेच 4.20 लाख रुपये किंमतीचे एकूण 8.4 ग्रॅम वजनाचे कोकेन असा अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून अंमली पदार्थ जप्त केले आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या गुन्ह्यात डोंबिवली येथे राहणारा इव्हल्स चिमेझी या नायजेरियन नागरिकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानेच सदर अंमली पदार्थांचा साठा मुख्य आरोपीला विक्रीसाठी आणून दिल्याचे तपासात आढळून आले आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. ही यशस्वी कारवाई नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे करीत आहेत.
