नारळाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी; सिडकोचे दुर्लक्ष

| उरण | वार्ताहर |

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सिडकोने पागोटे-भेडखळ-करंजा बंदर या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यावर नारळाची झाडे लावण्याचा व जतन करण्याचे काम हाती घेतले आहे. परंतु, सिडको आणि नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारांच्या दुर्लक्षितपणामुळे वारंवार सदर नारळाची झाडे आगीच्या ज्वाळात भक्ष्यस्थानी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये संतापाची भावना खदखदत आहे.

आधुनिक शहरांचे शिल्पकार म्हणून सिडको जनमानसात आपल्या नावाचा ठसा उमटवत आहे. उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा (झाडे लावा, झाडे जगवा) या माध्यमातून हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे-भेंडखळ-करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर 80 लाख रुपये खर्च करून नारळाची झाडे लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

परंतु सदर नारळाच्या झाडाजवळ पावसाळ्यात वाढणारे गवत काढण्याचा ठेका घेणार्‍या सिडकोच्या ठेकेदारांनी चक्क नारळाच्या झाडांजवळील काढण्यात येणारा गवत उचलून दुसर्‍या ठिकाणावर न नेताच सदर गवत त्याच ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सदर गवताला वारंवार आगी लागल्याच्या घटना घडत असून, या आगीत नारळाची झाडे होरपळून निघत आहेत. त्यातच सोमवारी (दि. 6) भरदुपारी रस्त्यालगत असलेल्या गवताला आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर आग ही महानगर गॅसच्या पाईपलाईनलगत लागली आहे. महानगर गॅसच्या पाईपलाईनला आगीची झळ बसली तर मोठा अनर्थ घडू शकतो. तरी सिडकोच्या अधिकार्‍यांनी नारळाच्या झाडाचे जतन, संवर्धन करण्याचा ठेका घेणार्‍या सदर ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी नागरिक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version