नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

कोळी समाजाने समुद्राला अर्पण केला नारळ

। अलिबाग । प्रतिनिधी ।

नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा अतिशय महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी विधीवत पुजा करून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात केली जाते. हा सण सोमवारी रायगड जिल्ह्यात अलिबागसह अनेक भागात उत्साहात पार पडला. पारंपारिक वेशभुषा करून मिरवणूक काढून समुद्रकिनारी पुजा करून समुद्राला शांत होण्याबरोबरच समुद्रात मासळी भरपूर मिळावी असे आवाहन करण्यात आले.

सकाळपासून कोळीवाड्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी नारळ फोडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. समुद्राला नैवेद्य देण्यासाठी महिलांनी नवनवीन पदार्थ तयार केले. सायंकाळी चारनंतर अलिबाग कोळीवाड्यासह आक्षी, नागाव, रेवस, मांडवा, मुरूड, श्रीवर्धन अशा अनेक कोळीवाड्यामधून मिरवणूक काढण्यात आली. कोळी गीतांच्या तालावर नाचत ही मिरवणूक समुद्रकिनार्‍यांपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीसोबत डोक्यावर कळश, पारंपारिक वेशभुषा करीत कोळी समाज सहभागी झाले होते. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक असे सर्वच मंडळी या मिरवणूकीमध्ये सहभागी झाले. समुद्राकिनारी मिरवणूक आल्यावर सर्वांनी समुद्राची विधीवत पुजा केली. कळशातील पाणी व सोन्याचा मुलामा असलेले नारळ समुद्राला अर्पण केले. त्यानंतर सुखरूप ठेवण्याचे साकडे समुद्राला घालण्यात आले.

नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजासाठी खुप महत्वाचा आहे. संध्याकाळी मिरवणूक काढली जाते. पारंपारिक वेशभूषा करून नाचत ही मिरवणूक समुद्रकिनारी आणली जाते. त्यानंतर समाजातील सर्व मंडळी एकत्र येऊन पुजा करतात. समुद्राला शांत राहण्याचे, सुखरुप ठेवण्याचे आवाहन केले जाते. ही परंपरा आजही नारळी पौर्णिमेला जपली जाते. त्यानंतर मासेमारीला सुरुवात केली जाते.

– विश्‍वनाथ पेरेकर, उपाध्यक्ष
अलिबाग महादेव कोळी समाज

Exit mobile version