हे समिंदरा,अशीच कृपावृष्टी राहू दे..
| अलिबाग | प्रतिनिधी |
संस्कृती आणि परंपरेशी नाते सांगणारा नारळी पौर्णिमा सण रायगड जिल्हयात बुधवारी सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मासेमारी पुन्हा सुरू होणार असल्याने सागराला सोन्याचा नारळ अर्पण करून शांत रहा आणि भरपूर मासळी मिळू दे असे साकडे कोळी बांधवांकडून घालण्यात आले. यावेळी जिल्हयात ठिकठिकाणी मिरवणूका काढण्यात आल्या. आबालवृध्दांपासून सर्वांनीच या मिरवणुकीत सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.

अलिबाग, वरसोली, मांडवा, रेवस, श्रीवर्धन, काशीद, बोर्ली, मुरुड, राजपुरी अशा अनेक कोळीवाडयात नारळीपोर्णिमेचा जल्लोष पहायला मिळाला. कुटुंबियांसमवेत पारंपरिक वेशभूषेत नटलेला कोळीवाडा आणि कोळीगीतांवर धम्माल नृत्य, असे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. सकाळपासून पताका, झेंडे आणि विद्युत रोषणाईने कोळीवाडा नटून गेला होता. त्यात बोटीही समुद्रकिनारी सजलेल्या दिसून आल्या. त्यात नारळ फोडीच्या स्पर्धेने या सणाच्या उत्साहात आणखी भर पडली. प्रत्येक पाडयातून कोळी बांधवांनी पूजेसाठीचा नारळ आणला. वेगवेगळ्या वाद्यांच्या गजरात अलिबासह संपुर्ण जिल्हयात ठिकठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

अलिबाग, वरसोली, थळ, रेवदंडा, श्रीवर्धन, मुरुड, बोर्ली येथील कोळीवाड्यातून संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये कोळी बांधव महिला, तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सामील झाले. एक वेगळा आनंद व उत्साह प्रत्येकांमध्ये दिसून आला. वाजत-गाजत कोळी बांधवांनी सोन्याचा प्रतीकात्मक नारळ पुजा करून समुद्राला मोठ्या श्रध्देने अर्पण केला. त्यानंतर शांत रहा आणि मासळी भरपुर मिळू दे असे साकडे घालण्यात आले.

यावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मिरवणूक तसेच समुद्रात नारळ अर्पण करण्याच्यावेळी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी, वाहतूक, बिटमार्शल व दामीनी पथकांचा समावेश होता.नारळी पौर्णिमानिमित्त अलिबासह जिल्ह्यातील सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी समुद्रकिनारी जाऊन कोळी बांधवांची भेट घेतली. सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या.