सावित्रीला नारळ केला अर्पण

| महाड | वार्ताहर |

ग्रामदैवत श्री विरेश्‍वर महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे सोमवारी (दि. 19) नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने विधीवत पुजन करून सावित्री नदीला नारळ अर्पण करण्यात आला. सावित्री नदीतीरावर वसलेल्या महाड शहराने अनेक वेळा या सावित्रीचे रौद्ररूप पाहिले आहे. परंतु, 2021 चा महाप्रलय हा मात्र महाडकरांसाठी काळा दिवसच ठरला होता.

या सावित्री नदीला वंदन करून तिचा प्रकोप होऊ नये यासाठी तिला शांत राहण्याचे आवाहन या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने केले जाते. नदीतीरी तिची प्रार्थना करून ‘हे सावित्री माते, आम्ही तुझी लेकरे आहोत आणि तू सर्वांना जीवन दे, तुझ्या प्रकोपाचा कोणालाही त्रास होऊ देऊ नकोस, सर्वांना गुण्यागोविंदाने नांदू दे’ अशा पद्धतीचे कृतज्ञभाव व्यक्त करून सावित्रीला हा नारळ अर्पण केला जातो. सालाबादप्रमाणे यंदादेखील ही परंपरा पाळण्यात आली असून महाड शहरातील नागरिक, व्यापारीवर्ग दर नारळी पौर्णिमेला येथे नारळ अर्पण करत असतात. परंतु 2021 चा सावित्री नदीचा प्रकोप आणि त्यामुळे आलेल्या महापुरानंतर महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्‍वर महाराजांच्या वतीने सावित्री मातेला शांत राहण्याचे आवाहन करण्यासाठी गेली तीन वर्षापासून दर नारळी पौर्णिमेला हा नारळ अर्पण करण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामदैवताच्या या नारळ अर्पण विधीनंतर इतर सर्व ग्रामस्थ आपआपला नारळ अर्पण करतात. दुपारी श्री विरेश्‍वर मंदिरात पंच कमिटी व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर वाजत गाजत शहरातील मुख्य बाजारपेठेतून गांधारी नाक्यापर्यंत मिरवणूक काढून नदीला हा नारळ अर्पण करण्यात आला.

यावेळी श्री विरेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, पंच दिलीप पार्टे, अनंत शेठ माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप माजी नगरसेवक सुदेश कळमकर सुनिल आगरवाल दिनेश जैन मोहन काका संकेत वारंगे पुजारी जंगम बुवा संजय मेहता पूजा जगताप उमेश जगताप नितिन आतै विजय जाधव तुषार महाजन नितिन आतै मिलिंद टिपणिस शहरांतील व्यापारी यांसह अन्य पदाधिकारी सदस्य, महाडकर नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version