विश्‍वचषकानंंतर विराट, रोहितला नारळ?

बीसीसीआयची नवीन मोर्चेबांधणी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

विश्‍वकरंडकानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंची चर्चा करून त्यांना क्रिकेटच्या एका प्रकारामधून निवृत्त होण्यास सांगण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमधून हे वृत्त समोर आले आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या यादीत विराट कोहली व रोहित शर्मा या दिग्गज क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून पुढे सांगण्यात आले की, भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडक आटोपल्यानंतर टी-20 क्रिकेटकडे लक्ष देण्यात येणार आहे. 2007 नंतर भारताने एकदाही टी-20 विश्‍वकरंडक पटकावलेला नाही. भारतातील आयपीएल स्पर्धेत युवा खेळाडू चमकत असतात. त्यानंतरही भारताला टी-20 क्रिकेट विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. ही बाब खटकणारी आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय निवड समिती योजना आखणार असून त्याची अंमलबजावणी एकदिवसीय विश्‍वकरंडकानंतर करण्यात येईल, असे ही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू रडारवर असणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, रवीचंद्रन अश्‍विन, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वरकुमार व के.एल.राहुल या खेळाडूंशी निवड समिती संवाद साधण्याची शक्यता आहे. विराट कोहलीची शारिरीक तंदुरुस्ती पाहता त्याला टी-20 क्रिकेटसाठी आणखी एक संधी देण्यात येऊ शकते. निवड समितीकडून भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडकासाठी (2023) 20 खेळाडूंची संभाव्य निवड करण्यात आली होती. आता निवड समितीला 2024 मध्ये वेस्ट इंडिज येथे होणार्‍या टी-20 विश्‍वकरंडकासाठी संभाव्य खेळाडूंची निवड करावयाची आहे. जेणेकरून स्पर्धा नजीक येईपर्यंत भारताची संघ बांधणी झालेली असेल. यशस्वी जयस्वाल, ॠतुराज गायकवाड, रिंकू सिंग, रवी बिश्‍नोई यांसारख्या खेळाडूंना भारताच्या टी-20 संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version