12 डिसेंबरला मोर्चा करणार असल्याचा दिला इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मिनीडोअर चालक, मालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मिनीडोअर चालक मालकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण दाखवून मोर्चाची परवानगी नाकारली. त्यामुळे तुर्तास हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. चालक व मालकांच्या मोर्चाला आचारसंहितेची आडकाठी आली असून 12 डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन देण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये विक्रम, मिनीडोअरसह टॅक्सीची संख्या साडेतीन हजार आहे. या व्यवसायातून स्थानिक मंडळी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. अनेकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या आहेत. कर्जाचे हप्ते या व्यवसायातून फेडण्याचे काम चालक व मालक करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील विक्रम, मिनीडोअरची वयोमर्यादा संपुष्टात आल्यावर शासन निर्णयानुसार, ती वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. त्यामुळे चालक व मालकांची परवाने रद्द केली जातील. चालक व मालकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होईल. ही समस्या सोडविण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी 12 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन न्याय हक्कासाठी मोर्चा काढणार असा इशारा दिला होता. त्या मोर्चाची तयारी देखील करण्यात आली. प्रशासनाकडे पत्र ही देण्यात आले होते.
आपल्या प्रलंबित वेगवेगळ्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबरला मोर्चा येणार असल्याने प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. अखेर जिल्हाधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण सांगून मोर्चाची परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चालक व मालकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा थांबावे लागणार असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम संपल्यानंतर विक्रम मिनीडोअर टॅक्सी, चालक मालकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी 12 डिसेंबरला 11 वाजता मोर्चा काढला जाईल असा इशारा रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक मालक संघाच्या वतीने देण्यात आला.
विक्रम मिनीडोअर चालक व मालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आचासंहितेमुळे मोर्चाची परवानगी जिल्हा प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून 12 डिसेंबरला मोर्चा काढला जाईल.
– विजयभाऊ पाटील,
जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक मालक संघ
