| पनवेल । वार्ताहर ।
अचानक काही दिवसांपासून हवामानात होणारे बदल, त्यात दिवाळीत करण्यात आलेल्या आतषबाजीमुळे वातावरणातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सर्दी-खोकला, अंगदुखी, डोकेदुखी या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत.
दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त सण साजरे होत असल्यामुळे नागरिकांकडून दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे दिसून आले. या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील ध्वनी आणि हवा प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. याचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. मागील काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. रात्रीच्या वेळेत वातावरणात गारवा निर्माण होत आहे. या वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आजारपणात आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिक सर्दी-खोकला, डोकेदुखी, अंगदुखी या आजारांनी त्रस्त आहेत.
जिल्ह्यात सकाळी ऊन तर, संध्याकाळी पाऊस अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. या वातावरणाच्या बदलामुळे सगळीकडे सर्दी-खोकल्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. विशेष म्हणजे सर्दी-खोकल्याचा आजार रुग्णांमध्ये आठवड्यापेक्षाही जास्त दिवस राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.