| सुधागड -पाली । वार्ताहर ।
वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे बहुतांश काम मार्गी लागले आहे. मात्र नवीन डांबरी व सिमेंटच्या रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर नसल्याने हा रस्ता असुरक्षित झाला आहे.
हिवाळा सुरू झाला, धुकं पडत असल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने या मार्गावर काही छोटे मोठे अपघात सुद्धा झाले आहेत. तसेच मार्ग रुंदीकरण दरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर असुरक्षित व धोकादायक खोदकाम केले आहे. काही कंपन्यांच्या इथे येणारे मोठे टँकर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावले जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा देखील येतो. या समस्यांमुळे देखील येथून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.
महत्वाचा मार्ग
वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवाशी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथे देखील शेकडो भावीक या मार्गाने येतात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतुक होते. परिणामी रिफ्लेक्टर व पांढर्या पट्ट्यांअभावी रात्रीच्यावेळी वाहने चालवितांना वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
हा राज्य महामार्ग अतिशय महत्वाचा आहे. नवीन डांबरी व सिमेंटच्या रस्त्याला दोन्ही बाजूने पांढरे पट्टे तसेच वळणावर रिफ्लेक्टर नसल्याने हिवाळा सुरू झाले असून धुकं पडत असल्याने वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शिवाय वाहतूक देखील मंदावते. त्यामुळे या राज्यमार्गावर रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे बसविण्यात यावेत.
महेश पोरे
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना
या मार्गावरील कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करणार आहोत.
सचिन निफाडे
उपअभियंता, एमएसआरडीसी