रायगडात थंडीची चाहूल;अलिबागमध्ये तापमानाचा ‘पारा’ घसरला

। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिवाळीची धामधूम सुरु असतानाच हवामानातही बदल झाल्याचे दिसून आले. मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटयाने बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट होऊ लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. अलिबागमध्ये गुरुवारी कमाल 32 अंश सेल्सिएस तर किमान 23 अंश सेल्सिएस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच 10 नोव्हेंबर रोजी अलिबागमध्ये तापमानाचा पारा घसरुन 19 अंश सेल्सिएसवर येणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राज्यात पुढील आठवडाभर कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

देशात 148 दिवसांचे वास्तव्य करून 23 ऑक्टोबरला र्नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी परतले. दिवाळीच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता आठवडयापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सध्याची स्थिती आहे.

कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडयातही काही भागांत किमान तापमानात घट होत आहे. कोकणात 19 ते 22, मराठवाडयात 14 ते 17, तर विदर्भात 17 ते 18 अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्‍वर येथे 12.2 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

Exit mobile version