| मुंबई | प्रतिनिधी |
यंदा पावसाने अगदी ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत हजेरी लावलेली असताना आता महाराष्ट्रामध्ये थंडीची चाहूल लागली आहे. थंडी हळूहळू महाराष्ट्रात दाखल होत असून, पुढील काही दिवसांत राज्यात गारठ्याचे साम्राज्य पसरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होणार आहेत. म्हणजे, सकाळ-संध्याकाळ थंडी आणि दुपारी थोडी उबदार हवा, असे हवामान अनुभवता येणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सध्या कोरड्या हवेचा प्रभाव असून, त्यामुळे आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. पण सकाळ-संध्याकाळ थंडी वाढेल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात किमान तापमान 12 ते 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये सकाळी लवकर गार वारा जाणवेल, तर कोकणात मात्र तापमान थोडं वाढतं राहील. एकूणच, महाराष्ट्रात थंडीची खरी सुरुवात झाली असून, दिवसभर ऊन असलं तरी रात्रीच्या वेळी गारठा अंगावर येतोय. पुढील काही दिवसांत ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आता गरम कपडे, ब्लँकेट आणि गरम पेयांचा मोसम सुरू झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
राज्यात थंडी हुडहुडी भरवणार
