| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात उद्यापासून थंडी वाढणार असून, काही भागांमध्ये पारा हा 10 अंश खाली येणार आहे. तर, येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या आठवड्यात राज्यात थंडीची लाट कायम राहील, असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, 6 ते 9 जानेवारी या कालावधीत विदर्भातील काही भागासह राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड इथं थंडीचा कडाका वाढला आहे, त्यामुळं लोक शेकोटीचा आधार घेत आहेत.
हिवाळा सुरू झाला असून गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागलीये. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचं किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्यानं राज्यात थंडीचं प्रमाण आणखी वाढल्याचं पाहायला मिळणार आहे.