सामूहिक प्रयत्न हाच विकासाचा राजमार्गः विनायक काशीद

| कर्जत | प्रतिनिधी |

सामूहिक प्रयत्न हाच विकासाचा राजमार्ग असल्याने संस्थेचा नावलौकिक टिकविण्यासाठी कटिबद्ध होऊ या, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे नवनियुक्त सदस्य विनायक काशीद यांनी येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण दालनात शास्त्रज्ञांना संबोधताना केले. अध्यक्षस्थानी सहयोगी संशोधन संचालक डॉ. शिवराम भगत होते.

पुढे बोलताना विनायक काशीद म्हणाले की, संशोधन केंद्राच्या विविध विभागात अल्प सुविधा असतानाही सुरू असलेले संशोधन कार्य प्रशंसनीय आहे. शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित, बदलत्या वातावरणाला पूरक अशा संशोधनाची आवश्यकता असून, त्यासाठी परदेशातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर संशोधन केंद्रावर व्हायला हवा. भाताच्या चुडापासून ‌‘स्ट्रॉ’ बनविण्यासाठी संशोधन केंद्राने पुढाकार घेतल्यास भात उत्पादक शेतकऱ्यांना अर्थार्जनाचं नवं दालन उपलब्ध होऊ शकेल, असा सल्ला त्यांनी दिला. विद्यापीठाचे संशोधन लोकांसमोर गेल्यास गैरसमज दूर होईल. प्रत्येक शास्त्रज्ञाने स्वतःची यशोगाथा तयार करावी, ती संबंध कोकणात गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मागील 20 वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असून, विविध देशांतील अनुभव पाठीशी असल्याने मिळालेल्या पदाचा उपयोग विद्यापीठाला शिखरावर नेण्यासाठी शास्त्रज्ञांच्या खांद्याशी खांदा लावून करेन, असे त्यांनी आश्वस्त केले. विद्यापीठ कार्यकारी परिषदेवरील निवडीबद्दल त्यांनी कृषीमंत्र्यांसह आ. हितेंद्र ठाकूर, आ. राजेश पाटील, आ.निरंजन डावखरे, कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. भगत म्हणाले की, पहिल्याच भेटीत काशीद यांनी सर्वच प्रक्षेत्रांना भेट देऊन संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेत संशोधनातील बारकावे जाणून घेतले, सांगोपांग चर्चेत बहुमूल्य सूचना करीत शास्त्रज्ञांशी समरस होत प्रसंगी कौतुकाची थाप तर दिलीच; शिवाय अडचणी जाणून घेण्याचा मोठेपणा दाखविल्याने सदर भेट संस्मरणीय ठरली.

यावेळी भात तज्ज्ञ डॉ. भरत वाघमोडे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील, भात शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. जालिंदर देवमोरे, कनिष्ठ पीक शास्त्रज्ञ मीनाक्षी केळुस्कर, कीटकशास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत, जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. तुषार बेडसे, मृद शास्त्रज्ञ डॉ. देवदत्त जोंधळे, कृषीविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. राजेंद्र सावळे या शास्त्रज्ञांनी त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची संक्षिप्त माहिती सादर केली. यावेळी समृद्ध कोकण अभियानाचे अजय यादवराव व अमित बाळसराफ, काजू प्रक्रिया संघ रत्नागिरीचे प्रताप पवार प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ. रवींद्र मर्दाने यांनी मानले.

Exit mobile version