हालिवली ग्रामपंचायत कडून मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हालिवली आणि किरवली ग्रामपंचायत हद्दीतून पनवेल कर्जत रेल्वे मार्ग जात आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेकडून बोगदा खोदण्यात येत असून त्या खोदकामासाठी सुरुंग स्फोट केले जात आहेत. दरम्यान, त्या सुरुंग स्फोटामुळे या दोन्ही ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांच्या घराला तडे गेले आहेत, तर अनेक विहिरींमधील झरे बंद पडले आहेत. त्याविरोधात हालिवली ग्रामपंचायत सरपंच प्रमिला बोराडे यांनी यापूर्वी दोनवेळा उपोषण केली आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने सरपंच बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना भेटून न्यायाची मागणी केली आहे.
पनवेल कर्जत रेल्वे प्रकल्प किरवली आणि हालिवली गावाच्या हद्दीत बोगदा खोदण्यात येत आहे. गेली दोनवर्षे काम सुरु असून त्या बोगद्यासाठी सुरुंग स्फोट गेली वर्षभर सुरु आहेत. त्या सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे जाण्याचे प्रकार घडले आहेत. या भागातील पिण्याच्या पाण्याची भूजल पातळी खालावली असून नैसर्गिक झरे यांचे पाणी आटल्याने विहिरींना पाणी राहिले नाही तर बोलरवेल यांचे पाणी पळून गेले आहे. त्याविरुद्ध स्थानिक ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी हालिवली ग्रामपंचायतच्या सरपंच प्रमिला बोराडे यांनी कर्जत येथे (दि.15) ऑगस्ट 2023 रोजी उपोषण केले होते. त्यावेळी चार दिवस साखळी उपोषणं केल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासने दिली होती.
(दि.18) ऑगस्ट 2023 रोजी दिलेली आश्वासने सहा महिन्यात पूर्ण झाली नाहीत म्हणून जानेवारी 2024 मध्ये पुन्हा एकदा सरपंच बोराडे या उपोषणाला बसल्या होत्या, त्यावेळी बेमुदत उपोषण करीत असताना तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. उपोषण स्थगित करताना प्रशासनाने आश्वासन दिले होते, मात्र त्यातील कोणतीही आश्वासने मान्य केली जात नाहीत. हे लक्षात आल्याने प्रमिला बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. कर्जत पनवेल रेल्वे बोगद्यामुळे बोगदा मुळे हालिवली व किरवली गावातील नुकसानी संदर्भात तहसिलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रशासनाने पूर्तता करावी. कर्जतच्या पर्यावरणीय ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार, त्यांना पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी यांची उच्च स्तरीय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन सरपंच प्रमिला सुरेश बोराडे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.