अभिनेते उदय नेने यांचे प्रतिपादन
गंधर्व महोत्सवाचा प्रारंभ
| पेण | वार्ताहर |
महाविद्यालयीन जीवन हे प्रत्येकाचे आयुष्य घडविणारे असते. त्यामुळे या वयात जे कमवाल ते आयुष्याला दिशा देणारे ठरेल, असे मत अभिनेते उदय नेने यांनी पेण येथे व्यक्त केले. स्वातंत्र सैनिक भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील गंधर्व महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना उदय नेने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी व्यासपीठावर पेण एज्युकेशन सोसायटीचे माजी.अध्यक्ष बापूसाहेब नेने, कार्याध्यक्ष वसंतराव आठवले, उपाध्यक्ष संजय कडू, कार्याध्यक्ष प्रसाद ओक, बाळासाहेब जोशी, समीर साने, डॉ. निता कदम, प्राध्यापक भौतिक रोपारेल, प्राध्यापिका सौ. खाडिलकर, ज्योती राजे, महेश हेलवडे अदी मान्यवर उपस्थित होते.
अभिनेते उदय नेने यांनी सांगितले की, पाच वर्षात आपल्याला आपल्या रक्तात किती विश्वास आहे, आपल्या श्वासात किती दम आहे आपल्याला किती दमवतोय आपली शक्ती किती मोठी आहे हे तपासून बघण्याची संधी ही पाच वर्ष आपल्याला देतात. एक अभ्यास सांगणारे असतात आणि मग त्या व्यतिरिक्त आपल्याला जीजी आवड आहे जे जे म्हणून शिकायच आहे ते ते शिकायची संधी ही पाच वर्ष आपल्याला देतात. तर मी तुम्हाला एवढच सांगेन या पाच वर्षाचा भरपूर उपयोग करा. खेळा, नाचा, नाटक करा, वाचा जी म्हणून आवड आहे ती पूर्ण करावे असे ते म्हणाले.
गंधर्व महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते गंधर्व नावाच्या फ्लेक्सची रीबन कापून करण्यात आले. यावेळी अॅड. बापूसाहेब नेने, अॅड. मंगेश नेने यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्राचार्य सदानंद धारप यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांना व्यासपिठावर नाशिक ढोल ताशाच्या गजरात आणण्यात आले. दोन दिवस चालणार्या महोत्सवामध्ये वेगवेगळया 18 प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश आहे. रायगड जिल्हयातील सर्व तालुक्यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे






