। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब गावातील खाडीकिनारी असलेल्या खारमाचेला सर्व्हे क्र. 94 येथे गावाकडून धरमतर खाडीच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला पूर्वापार पासून आहे. या नैसर्गिक नाल्याचे पाईप काढून मार्ग सुरळित करा अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा बापदेव शेतकरी मंडळाने दिला आहे.
याबाबत बापदेव शेतकरी मंडळातर्फे अध्यक्ष सुनिल कोठेकर, सुभाष कोठेकर, काशिनाथ कोठेकर, दिलीप कोठेकर, लहू कोठेकर, प्रविण म्हात्रे, महेंद्र कोठेकर, सचिन कोठेकर, इत्यादी शेतक-यांनी पत्रकार परिषदेत आत्मदहन करणार आसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. या बाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता खण्मी पर्देशन मुख्यमंत्री,कार्यकारी अभियंता खारभुमी विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागिय अधिकारी पेण यांना दिले आहे.
हा नाल्याचा मार्ग जेएसडब्ल्यु कंपनिने भरावाचा बांध घालत असताना चार सिंमेंन्टचे पाईप टाकून बंद करण्यात आला आहे. यामूळे येथील मच्छिमार खाडीकडे येण्या जाण्यासाठी हया नाल्याच्या पाण्यातून होडी घेवून मच्छिमारीचा व्यवसाय करीत असत. मात्र आता मार्गच बंद झाल्याने मच्छिमारी व्यवसाय ही बंद झाला आहे. परिणामी गेली दहा-बारा वर्षापासून मच्छिमारी बंद झाल्याने शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत खारबंदिस्ती विभाग व संबंधित प्रशासन दखल घेत नाही म्हणून सामुहिक आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला आहे.