एलईडी कारवाईच्या नावाखाली तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खेळ; मार्तंड नाखवा यांचा खळबळजनक आरोप
| उरण | प्रतिनिधी |
एलईडी लाईट व पर्ससीन नेट मासेमारीविरोधात सुरू असलेली सध्याची तथाकथित कारवाई म्हणजे कायद्याची अंमलबजावणी नसून, मत्स्यव्यवसाय विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उघड संगनमताचा आणि दिखाऊ कारभार आहे, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश मच्छिमार काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी केला आहे.
मत्स्यव्यवसाय आयुक्तांना पाठवलेल्या सविस्तर पत्रातून नाखवा यांनी विभागातील सह आयुक्त, प्रादेशिक आयुक्त आणि मुंबईतील परवाना अधिकारी यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एलईडी लाईट बोटींवरील कारवाई दरम्यान हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी एकाच बोटीत बसून ‘कारवाई’ करत असल्याचे दृश्य समोर येणे म्हणजे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर थेट घाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या दहा वर्षांपासून एलईडी लाईट मासेमारीला मूकसंमती, संरक्षण आणि सवय लावण्याचे काम करणारे हेच अधिकारी आज अचानक नैतिकतेचा आव आणून कारवाईचे नाटक करत आहेत, असा थेट आरोप नाखवा यांनी केला आहे. या तिघांपैकी एका सह आयुक्ताने स्वतःला ‘मी छत्रपती’ अशी उपमा दिल्याचा प्रकार केवळ अहंकाराचे प्रदर्शन नसून, संपूर्ण लोकशाही प्रशासकीय व्यवस्थेची थट्टा असल्याची टीका नाखवा यांनी केली. लोकशाहीत अधिकारी हे कायद्याचे सेवक असतात, राजे नव्हेत, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
प्रादेशिक आयुक्तांच्या बाबतीत तर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे नाखवा यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. पूर्वी रत्नागिरी येथे एलईडी लाईट बोट सोडून दिल्याच्या प्रकरणात ज्यांच्यावर निलंबनाची वेळ आली होती, तेच अधिकारी आज एलईडी मासेमारीविरोधात नैतिकतेचा झेंडा घेऊन पुढे येत असल्याचे चित्र हास्यास्पद आणि संतापजनक असल्याचा आरोप त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील परवाना अधिकाऱ्यांविषयीची सविस्तर माहिती व आकडेवारी मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे तसेच मुंबई शहराचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांच्याकडे देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. उलट, गैरप्रकार उघड करणाऱ्या मच्छिमारांनाच धमक्या, दबाव आणि दमदाटीला सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव अधिक धक्कादायक असल्याचे नाखवा यांनी अधोरेखित केले.
या संपूर्ण प्रकारावरुन मत्स्य विभागातील कारवाई ही निवडक, राजकीय सोयीची आणि मच्छिमारांना भयभीत करण्यासाठीच असल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे. काँग्रेस पक्ष आधुनिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या विरोधात आहे, हा अपप्रचार पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट करत नाखवा म्हणाले की, पारंपरिक मच्छिमारांप्रमाणेच आधुनिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छिमारांच्या हक्कांसाठी काँग्रेस ठामपणे उभी आहे.
किती दिवस दबाव, भीती आणि धमक्यांच्या जोरावर मच्छिमारांचा आवाज दाबला जाणार? असा सवाल उपस्थित करत नाखवा यांनी स्पष्ट केले की, आता काँग्रेसचे पदाधिकारी थेट केंद्र सरकारकडे जाऊन पर्ससीन नेट व एलईडी लाईट मासेमारीबाबतची वस्तुस्थिती मांडणार आहेत. कोणतीही कारवाई झाली तरी मच्छिमारांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
मच्छिमारांनाही सन्मानाने मासेमारी करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा तितकाच अधिकार आहे, जितका देशाच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याचा अधिकार शासनाला आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर जोरदार टीका केली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून वारंवार भूमिका बदलणे स्वीकारले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या खळबळजनक आरोपांमुळे मत्स्यव्यवसाय विभागातील कारभार, अंतर्गत संगनमत आणि मच्छिमारांच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली असून, राज्य सरकार व विभाग यावर कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण मच्छिमार समाजाचे लक्ष लागले आहे.
