मतमोजणीची रंगीत तालीम

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी मतमोजणीची रंगीत तालीम सोमवारी संपन्न झाली. त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा, मतमोजणी निरीक्षक कमलेश कुमार अवस्थी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत सोमवारी नेहुली येथील क्रीडा संकुलातील हॉलमध्ये संपन्न झाली.

यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण एक हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांसह विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

नेहुली येथील क्रीडा संकुलात मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व मतमोजणी अधिकारी आणि कर्मचारी यांनी घ्यावयाची दक्षता, कामाकाजाचा प्रोटोकॉल यांसह सर्व आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आणि सराव यावेळी करण्यात आला. निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व कार्यवाही करावी, असे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांनी सांगितले.
मोबाईल नेण्यास मनाई
निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.
Exit mobile version