| रत्नागिरी | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सणामध्ये शहर असो वा ग्रामीण भागात, दारासमोर तसेच अंगणात रांगोळी काढून त्याभोवती पणत्या लावण्यात येतात. त्यामुळे पारंपरिक मातीच्या, चिनीमातीच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ग्राहकांना सर्वाधिक भुरळ आहे ती फॅन्सी पणत्यांची.
बाजारात पणत्यांचे नवनवीन प्रकार उपलब्ध आहेत. आकर्षक रंगसंगतीने, नक्षीकाम करून सजवलेल्या मोहक रंगीत पणत्यांना वाढती मागणी आहे. केवळ घरी वापरण्यासाठी नाही, तर भेट देण्यासाठीही पणत्यांची खरेदी केली जात आहे. अंगणातच नाही तर दिवाणखान्याची शोभा वाढवत असल्याने वेगवेगळ्या आकारातील पणत्या, दिवे, पणत्यांचे स्टैंड, लामणदिवे, काचेचे विविध आकारातील आकर्षक फॅन्सी दिवे उपलब्ध असून, खरेदीसाठी ग्राहकांना भुरळ घालत आहेत.
ग्रामीण भागात भले मोठे अंगण असले तरी शहरात जागेच्या मर्यादेमुळे फ्लॅट संस्कृतीतही दरवाजासमोरील जेमतेम जागेत रांगोळी काढण्याची हौस भागविली जाते, संस्कृती जपली जाते. प्रवेशद्वाराजवळ एखाद्या नक्षीदार पितळी घंगाळात पाणी भरून त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या व फ्लोटिंग/तरंगणारे दिवे ठेवल्यास फारच विलोभनीय दिसते. वास्तुशास्त्रातही त्याला महत्त्व असल्याने पणत्यांना वर्षभर मागणी असते. तरंगणाऱ्या, सुवासिक पणत्या, क्रिस्टल पणत्या, दीपमाळेचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. दिव्यात तेल घालण्याची कटकट वाचविण्यासाठी मेणाच्या पणत्यांना वाढती मागणी आहे. 100 ते 400 रुपये डझन दराने विक्री सुरू आहे.







