वस्तूंच्या किंमतीमध्ये पाच टक्के वाढ; धूळीवंदन निमित्त बाजारपेठा सजल्या
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राज्यासह रायगड जिल्ह्यात होळीनंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन सण साजरा केला जातो. या निमित्त एकमेकाच्या अंगावर रंगाची उधळण केली जाते. त्यासाठी लागणारे पर्यावरण पुरक रंग तसेच वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या पिचकाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदा मात्र रंगासह पिचकाऱ्यांच्या किंमतीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एका वस्तूमागे किमान 5 रुपये अधिक मोजण्याची वेळ ग्राहकांवर येणार आहे.
धुलिवंदन निमित्त रंगाची उधळण करण्याचा खेळ ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी साजरा केला जातो. ही परंपरा आजही जपली जाते. यावर्षी होळी सोमवारी (दि.2) आहे. या दिवशी ठिकठिकाणी होळी उभारून विधीपत पूजन केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.3) धुलिवंदन आहे. या दिवशी सकाळपासून सर्वच ठिकाणी रंगाची उधळण केली जाणार आहे. एकमेकांच्या अंगावर रंग उडवून धुलिवंदनाचा आनंद लुटला जाणार आहे. धुलिवंदन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. धुलिवंदन साजरा करण्यासाठी लागणारे रंग, वेगवेगळ्या रंगाच्या व आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. साध्या पिचकाऱ्यांसह बंदुकवाल्या आणि टँकरवाल्या पिचकाऱ्यांची दुकाने सजली आहेत. तसेच, मुलांच्या आवडीचे छोटा भीम, बेनटेन, बॉबी डॉलची कार्टून असलेली पिचकारी देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या पिचकाऱ्यांची किंमत 10 रुपायंपासून 300 रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी किंमती स्थीर आहेत. तर, काही ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीमध्ये 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने या वस्तूंचे दर काही प्रमाणात वाढविण्यात आले आहे. महागाईची झळ असतानाही त्यावर मात करीत धुलिवंदन सण साजरा करण्यासाठी खरेदीला पसंती दिली आहे. जिल्ह्यातील अलिबागसह अनेक बाजारात पिचकाऱ्या खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 25 टक्के खरेदी झाली आहे. धुलिवंदनच्या दोन दिवस अगोदर म्हणजे 28 फेब्रवारी व 1 मार्च या तारखेला ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता विक्रेते संदेश तुणतुणे यांनी वर्तविली आहे.







