वाईट प्रवृत्तीला रोखण्यासाठी पुढे या: चित्रलेखा पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

काही मंडळी आपल्या स्वार्थासाठी दारुसह ड्रग्जच्या आहारी अनेक तरुणांना घालत आहेत. त्याचा तरुणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या वाईट प्रवृत्तीला रोखण्यासाठी महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.

खारेपाट विभाग हा शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा आहे. या भूमीला संघर्षाची सवय असून, अनेक लढाया लढल्या आहेत. स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील यांच्यासह स्व. मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील यांच्या पाठीशी हा विभाग कायमच राहिला आहे. ही साथ अशीच कायम राहू द्या. तुमच्या व तुमच्या विचारासोबत शेतकरी कामगार पक्ष पाठीशी कायम राहील, असा विश्‍वास चित्रलेखा पाटील यांनी दिला.

डावी चळवळ चुलीपर्यंत नेण्याचे काम महिलाच करू शकतात. महिलांची वैचारिक उंची वाढावी यासाठी अशा प्रकारचे मेळावे होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार वाड्या-वस्त्यांमधील महिलांनी पुढे नेणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी अन्यायाविरोधात लढण्यासाठी म्यानातून तलवार उपसली पाहिजे. निवडणुका जवळ आल्यावर अनेक योजना सुरु झाल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचादेखील समावेश आहे. या योजनेतून अनेक महिलांना दीड हजार रुपये मिळाले. परंतु, कांदा, बटाट्यासह लसणाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईची झळ महिलांना प्रचंड बसली आहे. नुसते पैसे देऊन चालणार नाही, तर महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. पंधराशे रुपये देण्यापेक्षा मुलींना पंधरा हजार रुपये कमविण्यासाठी स्वावलंबी बनवा, त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन खुले करून द्या, अशी संतप्त टीका चित्रलेखा पाटील यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालण्याचा प्रकार घडतो. त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतो. दारुमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात. हे रोखण्यासाठी महिलांनी पुढे येणे आवश्यक आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी महिलांनी जागरुक राहिले पाहिजे, आपल्या मुलांनादेखील पालकांनी शिकविले पाहिजे. तरच समाजात अमूलाग्र बदल होईल, याकडे चित्रलेखा पाटील यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version